आरोग्यमहाराष्ट्र,देश

बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची माहिती द्या

Nandgaon news

बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची माहिती द्या

ग्रामपंचायतींना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे निर्देश; १५ दिवसांत कागदपत्रांसह माहिती सादर करण्याचे आदेश
वेगवान मराठी : मारुती जगधने ५/९/२०२६
नांदगाव : नांदगाव तालुक्यात वैद्यकीय पदवी तसेच आवश्यक नोंदणी नसतानाही वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींविरोधात प्रशासनाने माहिती संकलनाची मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, नांदगाव यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपल्या गावातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रमेश जगताप यांच्या स्वाक्षरीने हे पत्र देण्यात आले आहे. पत्रात गाव अथवा कार्यक्षेत्रात कोणतीही वैद्यकीय पदवी व नोंदणी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणारी व्यक्ती आढळून आल्यास त्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास कळविण्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाने संबंधित व्यक्ती ज्या ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करीत आहे, त्या ठिकाणच्या घरमालकाचे नाव तसेच घरभाडे करारपत्र आहे किंवा नाही, याची माहिती मागवली आहे. तसेच संबंधित व्यक्तीच्या वैद्यकीय व्यवसायास ग्रामपंचायतीची परवानगी आहे किंवा नाही, याबाबतची माहिती व ग्रामपंचायतीचे ठराव/संबंधित कागदपत्रांची प्रतही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ही सर्व माहिती पत्र मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत विनाविलंब तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, नांदगाव येथे सादर करण्याचे आदेश ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, नांदगाव यांच्याकडून करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने ही कार्यवाही सुरू केल्याचे पत्रावरून स्पष्ट होते. त्यामुळे तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर आगामी काळात कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!