नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

आठवडी बाजारात वाहतूक कोंडी; नागरिक हैराण

nandgaon news

आठवडी बाजारात वाहतूक कोंडी; नागरिक हैराण

वेगवान मराठी: मारुती जगधने 3 सप्टेंबर 2026
नांदगाव : शहरातील बाजारपेठ परिसरात गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. रस्त्यावरच भाजीपाला विक्रेते, हातगाड्या तसेच अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे मुख्य रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
आठवडी बाजारासाठी शहरातील नागरिकांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात. मात्र, बाजारातील गर्दी आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पादचारी व वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. बाजाराच्या वेळेत रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, नांदगाव नगरपालिकेने नवीन सावता मंदिराच्या पाठीमागे पालिकेच्या जागेत आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे मागील महिनाभर वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला होता. मात्र, गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी भरलेल्या आठवडी बाजारात परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याचे दिसून आले. बाजार मुख्य रस्त्यावरून थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेत चिखल आणि दुर्गंधी असल्याचा आरोप बाजारातील विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विक्रेते पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन बसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, बाजाराचे नियोजन करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांनंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली आहे.
बाजारासाठी स्वतंत्र व सुयोग्य जागा, वाहनतळाची व्यवस्था, विक्रेत्यांसाठी आवश्यक सुविधा आणि वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. बाजाराच्या वेळेत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उपलब्ध जागेतील चिखल व दुर्गंधीची समस्या दूर करून विक्रेत्यांना तेथेच बाजार भरविण्यास प्रोत्साहन देणे, तसेच मुख्य रस्त्यावर वाहनांची पार्किंग होणार नाही याची दक्षता घेणे, हा वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय ठरू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!