नाशिक ग्रामीण

वनक्षेत्रातील अतिक्रमण, वृक्षतोड रोखण्याची मागणी

nandgaon news

वनक्षेत्रातील अतिक्रमण, वृक्षतोड रोखण्याची मागणी

उपनगर अध्यक्ष
राजेश भागवत शिंदे यांचे आरएफओंना निवेदन; पात्र भुधारकांच्या जमिनी निश्चित करून मेंढपाळांचा प्रश्न सोडविण्याची मागणी
वेगवान माराठी : मारुती जगधने ३ सप्टेंबर २०२६
नांदगाव : नांदगाव तालुक्यातील वनक्षेत्रात होत असलेले बेकायदेशीर अतिक्रमण व वृक्षतोड तातडीने थांबवावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष, नांदगाव नगरपालिकेच्या नियोजन समितीचे सभापती आणि नाशिक जिल्हाप्रमुख राजेश भागवत शिंदे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नांदगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांना दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अनधिकृत अतिक्रमणामुळे पारंपरिक पिढीजात मेंढीपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. स्थानिक मेंढपाळांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या वनक्षेत्राचा वापर करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या प्रश्नाकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शासन निर्णय व नियमानुसार पात्र भुधारक अथवा लाभार्थी निश्चित करून त्यांच्या जमिनीची हद्द निश्चित करावी आणि उर्वरित वनक्षेत्रातील अतिक्रमण हटवावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पात्र व्यक्तींच्या जमिनी निश्चित झाल्यास अनधिकृत अतिक्रमण व वृक्षतोडीला आळा घालण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच मेंढपाळांसाठी महत्त्वाचे असलेले वनक्षेत्र पाच वर्षांसाठी वनचराईसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्यातील जंगलामध्ये मेंढपाळांवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे व खटले मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून मेंढपाळ बांधवांना न्याय द्यावा, अन्यथा वन विभागीय कार्यालय, नांदगाव येथे भव्य ‘बिऱ्हाड मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश रामचंद्र नाईक, नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि नाशिक जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांना देण्यात आल्या आहेत.

फोटो कॅप्शन : वनक्षेत्रातील अतिक्रमण व वृक्षतोडीबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे यांना निवेदन देताना नगरसेवक राजेश भागवत शिंदे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!