
आईच्या स्मृती जपण्यासाठी पाच लाखांची गुरुदक्षिणा!
शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णू निकम यांचा न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात
वेगवान मराठी : दि 2 September2026
नांदगाव : ज्या शाळेत विद्यार्थ्यांना भाकरी करून खाऊ घालत एका कष्टकरी आईने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, त्याच शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत तिच्या मुलाने तब्बल पाच लाख रुपयांची देणगी देत आईच्या स्मृतींना अनोखी आदरांजली वाहिली.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. विष्णू निकम सर यांच्या मातोश्री कै. गंगुबाई निकम यांनी न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथे विद्यार्थ्यांसाठी भाकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अत्यंत कष्टाची परिस्थिती असतानाही त्यांनी आपल्या सहा मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण दिले. मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि ते आपल्या पायावर उभे राहावेत यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट उपसले. त्यांच्या त्यागामुळे सहाही मुले पुढे सरकारी सेवेत रुजू झाली.
‘ज्या संस्थेने माझ्या आईच्या कष्टांचा साक्षीदार होत आमच्या कुटुंबाच्या जडणघडणीत योगदान दिले, त्या संस्थेचे आपण काहीतरी देणे लागतो,’ या कृतज्ञतेच्या भावनेतून विष्णू निकम यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथील गुरुदक्षिणा हॉलसाठी पाच लाख रुपये किमतीचा धनादेश दिला.
समाज दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी हा धनादेश मा. संचालक श्री. अमित भाऊ बोरसे पाटील, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय यादवराव काकळीज सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आईच्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव ठेवत आपल्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या शाळेसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या विष्णू निकम यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. आईच्या ऋणाची परतफेड पैशांनी नव्हे, तर तिच्या संस्कारांना साजेशा कार्यातून करण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.



