
नांदगाव–साकोरा रस्त्यावर पदपथाचा अभाव; पादचाऱ्यांच्या जीविताला धोका
वेगवान मराठी :मारुती जगधने 17 July 2026
नांदगाव : नांदगाव–साकोरा मार्गावर वाढती वाहतूक लक्षात घेता सुरक्षित पदपथ (फुटपाथ) नसल्याने पादचारी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावरील रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांबाबत यापूर्वीही नागरिकांनी वारंवार आवाज उठवला आहे.
रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी खांदे अरुंद असून, काही ठिकाणी झुडपे व अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांपासून स्वतःचा बचाव करणे कठीण होत आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि वस्ती परिसरात पदपथ नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या मार्गाचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षित पदपथ, पावसाच्या पाण्याचा निचरा, रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे आणि झुडपांची साफसफाई करावी, अशी मागणी केली आहे. भविष्यात अपघात टाळण्यासाठी आणि पादचाऱ्यांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.



