प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे अद्यापही मिळाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Nandgaon news

वेगवान मराठी : मारुती जगधने दि :4 July2026
नांदगाव रेल्वे स्थानकाच्या विकासावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असला, तरी प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांचे थांबे अद्यापही मिळाले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नांदगाव रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात आला; मात्र स्थानक विकसित झाले तरी प्रवाशांच्या मूलभूत अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नांदगावकरांची प्रमुख मागणी म्हणजे पूर्वी नियमित थांबणाऱ्या जम्मू तवी–झेलम एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू करण्यात यावा. कोरोना काळात हा थांबा रद्द करण्यात आला होता. मात्र इतर अनेक स्थानकांवरील सेवा पूर्ववत झाल्यानंतरही नांदगावचा थांबा अद्याप सुरू झालेला नाही. पुणे येथे शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच सैन्य सेवेसाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.
तसेच अमरावती–पुणे एक्सप्रेस (पूर्वीची पुणे–भुसावळ एक्सप्रेस) या गाडीला नांदगाव येथे थांबा देण्याची जुनी मागणीही प्रलंबित आहे. ही गाडी नियमितपणे पिंपरखेड येथे लूप लाईनवर थांबत असल्याने नांदगाव येथेही थांबा देणे शक्य असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
यासंदर्भात प्रशासन, रेल्वे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी नांदगाव एक असूनही येथील रेल्वे प्रश्नांना अपेक्षित प्राधान्य मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
रेल्वे थांब्यांच्या मागण्यांसाठी सर्वपक्षीय आणि सर्वस्तरीय एकजूट होण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. नांदगावच्या रेल्वे प्रश्नांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी युवा फाऊंडेशन सामाजिक संस्थेसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.



