Uncategorizedनाशिक ग्रामीण

‘वसाका’ कारखान्यात पुन्हा चोरी; वेल्डिंग मशीन चोरताना एकाला रंगेहात पकडले, दोघे फरार

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : गेल्या साडेतीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या  देवळा तालुक्यातील  विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (वसाका) परिसरात पुन्हा एकदा चोरीचे सत्र सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. कारखान्यातील सुमारे २५ हजार रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन चोरत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एका चोरट्याला रंगेहात पकडले, तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ‘वसाका’चे सुरक्षा कर्मचारी शरद गरुड हे कारखान्याच्या परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना कारखाना मिल विभागाच्या बाजूने काही संशयास्पद हालचाली जाणवल्या. त्यांनी तात्काळ आपल्या सहकारी जोडीदाराला सोबत घेऊन मिल विभागात प्रवेश केला. त्यावेळी तीन तरुण तिथे जुने वेल्डिंग मशीन खोलत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांना पाहताच चोरट्यांची पाचावर धारण बसली आणि त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून तीन चोरट्यांपैकी सागर भाऊसाहेब पवार याला रंगेहात पकडले, तर त्याचे इतर दोन साथीदार पळून गेले. पकडलेल्या संशयिताकडे अधिक चौकशी केली असता, त्याने आपल्यासोबत आणखी दोन साथीदार असल्याची कबुली दिली.

जमावाने दिला चोप; पोलीस घटनास्थळी दाखल

दरम्यान, ‘वसाका’ कारखान्यात चोर पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. रात्रीच्या अंधारातच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. संतप्त झालेल्या जमावाने पकडलेल्या चोरट्याला चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी कोरडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरट्याला जमावाच्या ताब्यातून सोडवून ताब्यात घेतले.

देवळा पोलिसांत गुन्हा दाखल
या चोरीच्या घटनेबाबत सुरक्षा कर्मचारी कैलास तुळशीराम निकम यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शनिवार दुपारी याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर भाऊसाहेब पवार याला अटक केली असून, फरार झालेल्या इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनय देवरे व पोलीस कर्मचारी कोरडे पुढील तपास करीत आहेत.

अपुरा सुरक्षा कर्मचारी वर्ग अन् अंधाराचे साम्राज्य!।
 ‘वसाका’ कारखाना सध्या बंद असून, कारखान्याच्या विस्तीर्ण परिसरात रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. त्यातच येथे अत्यंत अपुरा सुरक्षा कर्मचारी वर्ग तैनात आहे. याच गोष्टीचा फायदा चोरटे घेत असून, यापूर्वीही वसाकाच्या आवारात अनेक मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. कारखान्याची सुरक्षा वाढवण्याची मागणी आता कामगार आणि परिसरातून होत आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!