परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; पोल्ट्री व्यवसाय कोलमडला, वीज यंत्रणा विस्कळीत!
Nandgaon news
परिसराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; पोल्ट्री व्यवसाय कोलमडला, वीज यंत्रणा विस्कळीत!
वेगवान मराठी : मारुती जगधने दि 21 मे 2026
तालुक्यातील साकोरा नांदगाव पंचकोशी त आणि परिसरात बुधवारी (दि. २० व 23 रोजी ) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक निवासी घरे, जनावरांचे गोठे आणि व्यावसायिक पोल्ट्रीचे छताचे पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
साकोरा-नांदगाव रस्त्यावर दोन ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच माजी सरपंच अतुल पाटील तथा प्रशासक यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर झाले .
पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका;
हजारो कोंबड्यांचा मृत्यू
वादळाचा सर्वाधिक फटका परिसरातील पोल्ट्री व्यवसायाला आणि घरांना बसला आहे.
गट नंबर ११०४ (सर्जेराव छत्रे): यांच्या पोल्ट्रीवर कडुनिंबाचे मोठे झाड कोसळल्याने पोल्ट्रीचे अतोनात नुकसान झाले. छप्पर कोसळल्याने हजारो कोंबड्या दबून मृत झाल्या आहेत.
डॉक्टरवाडी रस्ता, गट नंबर ९६० (राजेन्द्र पवार): यांच्यासह परिसरातील इतर अनेक पोल्ट्रीचे छताचे पत्रे वादळामुळे उडून गेले आहेत.
याशिवाय, पांढरवड मुळ डोंगरी परिसरातील अनेक निवासी घरांचे पत्रे उडाल्याने संबंधित कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला आहे.
वीज यंत्रणा कोलमडली; २० हून अधिक खांब कोसळले
या वादळाचा मोठा फटका महावितरणच्या पायाभूत सुविधांनाही बसला आहे. साकोरा-नांदगाव पंचक्रोशीमध्ये जवळपास २० हून अधिक विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या विभागीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणचे कर्मचारी योग्य त्या उपाययोजना करत असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
ग्रामस्थांची मागणी
या भीषण आपत्तीमुळे शेतकरी आणि व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून बाधितांना त्वरित शासकीय मदत द्यावी, अशी तीव्र मागणी साकोरा व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे



