नाशिक ग्रामीण
७/१२ उताऱ्यावर नाव लावण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना तलाठी व खाजगी इसम लाचलुचपतच्या जाळ्यात

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : शेत जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरून बहिणीचे नाव कमी करून स्वतःचे नाव लावण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना देवळा तालुक्यातील खामखेडा येथील वर्ग-३ चे तलाठी आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या एका खाजगी इसमाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही धडक कारवाई देवळा येथील वाजगांव रस्त्यावरील टीव्हीएस मोटारसायकल शोरूमसमोर करण्यात आली. पप्पू काशिनाथ सोनकांबळे (वय ४६, व्यवसाय- नोकरी तलाठी खामखेडा, रा. आहेर मळा, देवळा) आणि प्रशांत दावल सोनवणे (वय २४, धंदा- मजुरी, रा. खामखेडा, ता. देवळा) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे देवळा तालुक्यातील महसूल विभागात आणि संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळ तक्रारदार यांच्या खामखेडा शिवारातील शेत गट क्र. १२७ मधून त्यांच्या बहिणीचे नाव हक्कसोड पत्रान्वये कमी करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय खामखेडा येथे अर्ज केला होता. मात्र, बहिणीच्या नावाऐवजी मूळ तक्रारदार यांचेच नाव ७/१२ उताऱ्यावरून कमी झाले होते. या गंभीर चुकीबाबत जेव्हा तक्रारदार तलाठी पप्पू सोनकांबळे यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले, तेव्हा ७/१२ उताऱ्यावर पुन्हा नाव लावून देण्यासाठी तलाठ्याने ५,०००/- रुपये लाचेची मागणी केली. तर खाजगी इसम प्रशांत सोनवणे याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या पडताळणीत आरोपी तलाठ्याने यापूर्वीच १,०००/- रुपये स्वीकारले असल्याचे मान्य केले. त्यानंतर आज उर्वरित ५,०००/- रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन्ही आरोपींना रंगेहात दबोचले. यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला; लाच स्वीकारताना पकडल्यानंतर आरोपी तलाठी पप्पू सोनकांबळे याला जेव्हा शासकीय वाहनात बसवण्यात आले, तेव्हा त्याने अत्यंत चालाखी करून स्वतःच्या खिशातील लाचेची रक्कम गाडीबाहेर फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा थरारक प्रयत्न केला. मात्र, एसीबीच्या सतर्क पथकाने त्याचा हा प्रयत्न वेळीच हाणून पाडला आणि लाचेची रक्कम जप्त केली.
याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक एकनाथ पाटील, पोलीस हवादार योगेश साळवे, पोलीस कॉन्स्टेबल चेतन शेवाळे आणि चालक पोलीस नाईक परशराम जाधव यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नेहा सुर्यवंशी करत आहेत.



