नाशिक ग्रामीण
कौटुंबिक वादातून देवळा तालुक्यात मेव्हण्याने केला सालीचा खून

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : कौटुंबिक वादातून मेव्हण्याने आपल्या सालीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात शुक्रवारी (दि. २२ मे) घडली. छाया ज्ञानेश्वर जाधव (वय ३५) रा. निफाड असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपीला खामखेडा येथील सरपंच आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी मयत महिलेचे पती ज्ञानेश्वर सुरेश जाधव (वय ४१, रा. कॉलेज रोड, अहिल्यादेवी नगर, निफाड) यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत छाया जाधव यांची बहीण माया हिचा विवाह श्याम आगनदास माळी (रा. धोडांबे, ता. चांदवड) याच्यासोबत झाला होता. श्याम हा भऊर फाटा परिसरात मजुरी करत होता. मात्र, दारूच्या व्यसनापोटी तो पत्नी माया हिच्याकडून मजुरीचे पैसे हिसकावून घेत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत असत. या त्रासाला कंटाळून माया २१ मे रोजी आपल्या माहेरी निफाड येथे आली होती. त्यावेळी तिची बहीण छाया यांनी पती ज्ञानेश्वर यांना फोन करून, श्याम दारू पिऊन मारहाण करत असून “देवळ्याला या, डायरेक्ट चिरून टाकतो,” अशी धमकी देत असल्याचे सांगितले होते.
शुक्रवारी सकाळी ज्ञानेश्वर जाधव, पत्नी छाया, सासू ताईबाई, साला सोनू कराटे व इतर नातेवाईक श्याम माळीची समजूत काढण्यासाठी भऊर फाटा येथे गेले होते. ते निखील आहेर यांच्या शेताच्या गेटजवळ थांबले असता, आरोपी श्याम त्याचा पुतण्या दादू माळी याच्यासोबत मोटारसायकलवरून तिथे आला. नातेवाईक त्याची समजूत काढत असतानाच आरोपीने अचानक चाकू काढून पत्नी मायावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनू कराटे यांनी मायाला मागे ओढल्याने तिचा जीव वाचला. याचा राग येऊन आरोपीने “तू कायम आमच्या नवरा-बायकोमध्ये येते,” असे म्हणत छाया जाधव यांच्या छातीवर चाकूने जोरदार वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या छाया यांना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या भांडणात सोनू कराटे यांच्याही दोन्ही हातांना चाकू लागून दुखापत झाली आहे.
घटनेनंतर आरोपी श्याम माळी घटनास्थळावरून पसार झाला होता. तो पिळकोस-खामखेडा-सावकी परिसरात असल्याची माहिती देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते व पोलीस शिपाई संदीप चौधरी यांनी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच अॅड. वैभव पवार यांना दिली.
माहिती मिळताच सरपंच वैभव पवार यांनी तातडीने खामखेडा चौफुली परिसरात शोध सुरू केला. पोलिसांच्या फोटोवरून संशयित आरोपी जात असल्याचे दिसताच, त्यांनी गावातील सोनू शेवाळे, माणिक शेवाळे, सचिन शेवाळे, रोशन शेवाळे, अमोल बिरारी, वकील शेवाळे व सौरभ शेवाळे यांना गोळा केले. सर्वांनी मिळून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आरोपी श्याम माळीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ग्रामस्थांच्या या धाडसी कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.
आरोपीविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, विनय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराहाते, भास्कर सोनवणे, दिलीप सोनवणे, संदीप चौधरी, शरीफ शेख, राहुल शिरसाठ व संजय मोरे पुढील तपास करीत आहेत.



