श्रीरामनगर परिसरात शेतपंपाची २५० फूट कॉपर वायर चोरी; शेतकऱ्यांमध्ये संताप
Nandgaon news
श्रीरामनगर परिसरात शेतपंपाची २५० फूट कॉपर वायर चोरी; शेतकऱ्यांमध्ये संताप
वेगवान मराठी : मारुती जगधने दि . 13 मे 2026
नांदगाव तालुक्यातील श्रीरामनगर हद्दीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना लक्ष्य करत चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दि. ११ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शांकंबरी नदी किनारी असलेल्या शेती भागातील पंपाची तब्बल २५० फूट लांबीची कॉपर वायर अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती देताना बाल शेतकरी गणेश गुलाब महाजन याने सांगितले की, भगवान सखाहरी महाजन व सुदाम अंबु जेजुरकर यांच्या शेतातील शेतीपंपाची कॉपर वायर रात्रीच्या वेळी चोरट्यांनी कापून नेली. सकाळी शेतकरी शेतात गेले असता ही बाब उघडकीस आली. चोरीमुळे शेतीपंप बंद पडले असून पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शांकंबरी नदी किनारी असलेल्या शेतांमध्ये वीजपंपासाठी टाकण्यात आलेली वायर मोठ्या प्रमाणात असल्याने चोरट्यांनी नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाढत्या कॉपर वायर चोरीच्या घटनांमुळे शेतकरी भयभीत झाले असून रात्रीच्या वेळी शेतीमालमत्ता सुरक्षित राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात अद्याप अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र परिसरातील शेतकऱ्यांनी पोलिसांनी रात्री गस्त वाढवून अशा चोरीच्या घटनांना आळा घालावा, अशी मागणी केली आहे.



