शहरात वाढत्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वेगवान मराठी : मारुती जगधने
दिनांक 7 मार्च 2026
नांदगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री घडलेल्या ताज्या घटनेने तर शहरातील मुख्य बाजारपेठही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नांदगाव शहरातील भगवान महावीर मार्गावर असलेल्या भिवराज कांमल पारख यांच्या व्यापारी पिढीच्या दुकानात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. दुकानातील ड्रॉवरमधील सुमारे तीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सकाळी दुकान उघडताना ही घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये नांदगाव शहरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी पेंढारकर बाबा यांच्या हातातील सुमारे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याने पळविल्याची घटना घडली होती. त्यानंतर गोविंद अग्रवाल यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून दुपारच्या वेळेला सुमारे पाच लाख रुपयांची रोकड चोरीला गेली. तसेच काकळीज नामक सेवानिवृत्त नागरिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे तीन लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना देखील घडली होती.
याशिवाय नांदगावच्या गुरुवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी मोबाईल चोरी, महिलांच्या अंगावरील दागिने चोरीला जाणे यासारख्या घटना वारंवार घडत असल्याच्या मौखिक तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
या सर्व घटनांची काही प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्यात नोंद झाली असली तरी अद्यापपर्यंत कोणत्याही मोठ्या चोरीचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी चोरट्यांचा अद्याप मागमूस लागत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज मुख्य बाजारपेठेत घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील मुख्य बाजारपेठही सुरक्षित राहिलेली नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून गुन्हेगारांना जेरबंद करावे आणि शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दिनांक 6 मार्च रोजी रात्री च्या सुमारास पारख यांच्या पिढीच्या दुकानातून चोरट्यांनी कॅश लंपास केल्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिनांक 7 मार्च रोजी सकाळी देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरू आहे .
नांदगाव शहरामध्ये चोरींचे सत्र सुरू असल्याने चोरीचा तपास मात्र पुरेपूर लागत नसल्याने नांदगाव च्या या महत्वपूर्ण घटनांकडे ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि पोलीस उपअधीक्षक मनमाड या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील या घटनेकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे .



