अखंड हरिनामाचा ४४ वर्षांचा प्रवास; या गावच्या श्रद्धेला खांदेशरत्न तुकाराम बाबांची सलामी
अखंड हरिनामाचा ४४ वर्षांचा प्रवास; या गावच्या श्रद्धेला खांदेशरत्न तुकाराम बाबांची सलामी

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला /दिनांक :23: फेब्रुवारी/येवला तालुक्यातील सायगाव येथे मागील सलग ४४ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा अविरतपणे सुरू असून गावाने जपलेली ही भक्तीपरंपरा आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे. चार दशके ओलांडूनही नामसेवेची अखंड ज्योत तेवती ठेवणाऱ्या ग्रामस्थांच्या श्रद्धा, सातत्य आणि एकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यंदाच्या सप्ताहात जाहीर हरिकीर्तनासाठी उपस्थित राहिलेले प्रेममूर्ती खांदेशरत्न ह.भ.प. तुकाराम बाबा जेऊरकर यांनी सायगावच्या ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन केले. “४४ वर्षे अखंड नामसेवा ही साधी गोष्ट नाही; ही गावाच्या सामूहिक श्रद्धेची आणि संतपरंपरेवरील निष्ठेची जिवंत साक्ष आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कीर्तनादरम्यान त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग क्रमांक २३७ याचा उल्लेख करत नाममहिमा स्पष्ट केला.
बळियाचे अंकित ।
आम्ही झालों बळिवंत ॥१॥
लाताळीता संसारा ।
केला षड ऊर्मीचा मारा ॥ध्रु.॥
जन धन तन ।
केलें तृणाही समान ॥२॥
तुका म्हणे आतां ।
आम्ही मुक्तीचिया माथां ॥३॥
या अभंगातून संसाराच्या मोहाला लाथाडून नामस्मरणात स्थिर राहण्याचा संदेश संतांनी दिला आहे, असे सांगत महाराजांनी उपस्थितांना नामभक्तीचे महत्त्व पटवून दिले. ज्या गावात हरिनाम अखंड घुमते, तेथे नैतिकता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य आपोआप वृद्धिंगत होते, असे ते म्हणाले.
सायगावने नामभक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासली असून युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी उपस्थिती ही गावाच्या एकजुटीची साक्ष देणारी आहे. सप्ताहादरम्यान “राम कृष्ण हरी” च्या अखंड गजराने वातावरण भारावून गेले आहे.
भक्तिरस, समता आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम सायगावमध्ये अनुभवायला मिळत असून ४४ वर्षांची ही अखंड नामपरंपरा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहे.



