नाशिक ग्रामीण

उमराणेजवळ शहादा आगाराच्या बसला भीषण अपघात; चालकासह ३० हून अधिक प्रवासी जखमी!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : पुण्याहून शहादाकडे जाणाऱ्या शहादा आगाराच्या बसला उमराणे शिवारातील रामेश्वर गोशाळेजवळ आज बुधवार (दि. १३) रोजी सकाळी ८:१५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रात्रभर बस चालविल्यामुळे चालकाचा डोळा लागल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून शेतात उलटली. या अपघातात चालकासह ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहादा आगाराची बस (क्रमांक एम.एच. १४  एम.एच. २३१०) मंगळवारी रात्री १०:१५ वाजता पुण्याहून प्रवाशांना घेऊन शहादाकडे निघाली होती. बुधवारी सकाळी नाशिककडून मालेगावकडे जात असताना, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे शिवारात रामेश्वर गोशाळेजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. बस वेगाने रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडाला धडकली आणि लगतच्या शेतात जाऊन पलटी झाली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चालक रात्रभर बस चालवत असल्याने त्यांना झोप लागली असावी, ज्यामुळे हा अपघात घडला.

अपघाताचा आवाज होताच स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते नंदन देवरे, सुनील सुदाम देवरे यांनी तातडीने धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. बसमध्ये एकूण ६० प्रवासी होते (५८ प्रौढ आणि २ लहान मुले), अशी माहिती वाहक जे. व्ही. निकम यांनी दिली. रुग्णवाहिका चालक राहुल वाघ यांनी जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालय, सुविधा हॉस्पिटल आणि श्री साई केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मालेगाव आगाराच्या व्यवस्थापक मनीषा देवरे आणि देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. देवळा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि खुरासणे पुढील तपास करत आहेत. भविष्यात येथे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक आणि सुरक्षा फलक लावण्याबाबतही प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!