नाशिक ग्रामीणनाशिक शहर

अबब…! वन खात्यातील मोठा अधिकारी व वनपाल ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या रंगेहात जाळ्यात

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

हायवा डम्पर वाहन सोडवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागून त्यातील ३५ हजार रुपये स्वीकारताना हरसुल (ता. त्र्यंबकेश्वर) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कैलास नवनाथ सोनवणे (वय…, वनपरिक्षेत्र अधिकारी – वर्ग २) आणि सुनिल बाळासाहेब टोंगारे (वनपाल – वर्ग ३) यांचा समावेश आहे. दोघेही वनपरिक्षेत्रीय प्रादेशिक कार्यालय, हरसुल येथे कार्यरत आहेत.
तक्रारदाराने आपल्या मुलाच्या नावावर टाटा कंपनीची हायवा डम्पर (क्रमांक MH-12-TRFLK692) दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी नवीन खरेदी केली होती. घराच्या प्लास्टरसाठी खामशेत (ता. पेठ) येथील नदीतून अर्धा ब्रास वाळू वाहतूक करत असताना सदर वाहन वन विभागाने जप्त करून वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

यानंतर दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी वाहन सोडवून घेण्यासाठी तक्रारदार हरसुल येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात गेला असता, आरोपी कैलास सोनवणे यांनी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने दि. १ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

पडताळणी दरम्यान आरोपी सोनवणे यांनी सुरुवातीला ३५ हजार रुपये व वाहन सोडल्यानंतर उर्वरित १५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तसेच आरोपी वनपाल सुनिल टोंगारे याने या रकमेपैकी १० हजार रुपये स्वतःसाठी मागितले. त्यानुसार दि. २ जानेवारी २०२६ रोजी हरसुल येथील वनपरिक्षेत्रीय कार्यालयात ३५ हजार रुपये स्वीकारताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात शरद हेंबाडे, अविनाश पवार, युवराज खांडवी, दिनेश खैरनार व परशुराम जाधव यांचा समावेश होता. तपासास पोलीस निरीक्षक अतुल चौधरी मार्गदर्शन करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास तत्काळ तक्रार करावी.
संपर्क :
टोल फ्री क्रमांक – १०६४
संकेतस्थळ – acbmaharashtra.gov.in
ई-मेल – spacbnashik@mahapolice.gov.in

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!