नाशिक ग्रामीण

येवला तालुक्यातील या ठिकाणी संस्था चालकाच्या निष्काळजीपणामुळे १३ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप ; गुरुकुल व्यवस्थापकाविरोधात येवला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.२६ डिसेंबर २०२५ :- मुखेड ता.येवला येथे असलेल्या ओम दिनानाथ गुरुकुल व्यवस्थापनाच्या कथित निष्काळजीपणामुळे नैताळे ता.निफाड येथील १३ वर्षीय सार्थक संजय बोरगुडे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, असा आरोप करत सार्थकच्या नातेवाईकांकडून गुरुकुलचे व्यवस्थापक श्रीराम भिमराव पांगरे यांच्याविरोधात येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
सार्थकचे चुलते समाधान विठ्ठल बोरगुडे वय ३५ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा पुतण्या सार्थक बोरगुडे हा वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी दि.२५ जून २०२५ पासून ओम दिनानाथ गुरुकुल, मुखेड येथे दाखल होता. रविवार दि.२१ डिसेंबर रोजी फिर्यादी व कुटुंबीय सार्थकला भेटण्यासाठी गुरुकुलमध्ये गेले असता तो तेथे आढळून आला नाही.
याबाबत व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता, ‘तो गावात गेला असेल’ असे उत्तर देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता, गुरुकुलपासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर गोई नदीच्या काठावरील विहिरीजवळ संशयास्पद स्थिती आढळून आली. स्थानिकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतल्यानंतर सायंकाळी ५.४० वाजता सार्थकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यास तातडीने येवला येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गुरुकुल परिसरास कोणतीही संरक्षक भिंत नव्हती, सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नव्हता तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीबाबत योग्य खबरदारी घेण्यात आली नव्हती. संस्थेच्या या कथित हलगर्जीपणामुळेच सार्थकचा जीव गेला असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गुरुकुल व आश्रमशाळांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!