नाशिक ग्रामीण

टोळक्यावर ॲट्रॉसिटी प्रकरणास वेगळे वळण, परस्पर विरोधी फिर्यादीवरून पोलिस पाटील व त्यांचे भावाविरुद्ध गुन्हा दाखल

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक १० डिसेंबर २०२५ :- सारोळे खुर्द ता.निफाड येथील पोलीस पाटील भाऊसाहेब बर्डे यांना झालेली शिवीगाळ व मारहाण प्रकरणी दाखल ॲट्रॉसिटी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. फिर्यादी पोलीस पाटील व त्यांचे भावाविरुद्ध परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली असून त्यावरून पोलीस पाटील व त्यांचे भावाविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी रतन दामोदर नागरे यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, दिनांक ४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेचे सुमारास आमचे गावातील म्हसोबा महाराजाची यात्रा असल्याने, रथ मिरवणूक संपल्याने मी व माझा मुलगा किरण रतन नागरे आमचे घरी जात असताना संदीप हॉटेलवर थांबलो होतो. तेव्हा तेथे गावातील निखिल नाईक व रवि पिंपळे यांच्यात शाब्दिक भांडण चालू होते. ते मी भांडण सोडवत असताना तेथे आमच्या गावातील पोलीस पाटील भाऊसाहेब खंडु बर्डे हे आले. त्यांनी मला धक्का दिला व ‘ तुम्ही इथे कशाला भांडण करता?’ असे बोलले. त्यावेळेस मी त्यांना बोललो की, ‘ मला धक्का का दिला? माझे भांडण नाही, मी त्यांचे भांडण सोडवत होतो, तुम्ही त्यांना समजून सांगा’ असे बोलत असताना माणिक खंडु बर्डे तेथे आल्यानंतर ‘ माझ्या भावाशी का वाद घालतो?’ असे बोलून वाईटसाईट शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मला मारहाण करू लागले असता त्यांना माझा मुलगा व मी समजावत असताना भाऊसाहेब खंडू बर्डे यांनी हातातील लाकडी काठीने माझ्या मुलाच्या डोक्यात पाठीमागून मारून दुखापत केली व ‘तुम्ही आमच्या विरोधात तक्रार केली तर मी तुमच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत तक्रार दाखल करीन’ असा दम दिला. त्यावेळी तो खाली जमिनीवर पडला. त्यावेळी माझ्या मुलाने आरडाओरड केल्याने आमच्या गावातील ऋषिकेश नागरे, गणेश नागरे, प्रकाश नागरे, सचिन नागरे, गणेश निवृत्ती नागरे, कैलास आव्हाड अशांनी माझ्या मुलाच्या डोक्यातून रक्त येत असल्याने त्याला खाजगी वाहनाने साई मल्टिपेशालिटी हॉस्पिटल निफाड येथे उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी मुलाला ॲडमिट करून घेतले. त्यानंतर मुलगा किरण यांस आज रोजी बरे वाटू लागल्याने मी पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहे असे म्हटले आहे.
त्यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात भा.दं.वि. २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार औदुंबर मुरडनर अधिक तपास करीत आहेत.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!