नासिक अँटी करप्शन ब्युरोची मोठी कारवाई महसूल विभागातील नायब तहसिलदार २.५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

वेगवान नाशिक /किरणकुमार आवारे
वेगवान ब्युरो रिपोर्ट दिनांक १० डिसेंबर :-
ला.प्र. विभागाच्या सापळा कारवाईत सिन्नर येथील महसूल नायब तहसिलदार संजय भिकाजी धनगर (वय ५१) यांना २,५०,००० रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराच्या मुलगा व सुनेच्या नावावर मौजे दोडी खुर्द ता. सिन्नर येथील गट नं. ४९९ या जमिनीच्या फेरफार नोंद क्रमांक ३३४५ बाबत अनुकूल निकाल देऊन ती मंजूर करून देण्यासाठी १० लाखांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर २.५ लाख रुपये घेण्याचे आरोपीने मान्य केले होते.
दि.०९ डिसेंबर रोजी सोपान हॉस्पिटलसमोर, नाशिक येथे लाच स्वीकारण्याचे ठरल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकने सापळा लावून कारवाई केली. तक्रारदाराकडून पंचासमक्ष रक्कम स्वीकारताच आरोपी धनगर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (क्र. ४५३/२०२५) करण्यात आला असून आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत कारवाई झाली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. संदीप वणवे, पोकों. प्रमोद पाळदे, पोहवा. शरद हेंबाडे, पोहवा. युवराज खांडवी यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कारवाईला पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेडी व सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन मिळाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाबाबत तक्रार असल्यास विभागाशी संपर्क साधावा.



