नाशिक जिल्ह्यातील सन २०१४ च्या खळबळ उडवून देणाऱ्या घटनेचा निकाल; स्वतःच्या अंध व अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ :- स्वतःच्या अल्पवयीन अंध व अल्पवयीन युवतीवर पित्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप सिध्द झाल्याने निफाड येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी. कोऱ्हाळे यांनी आरोपी पित्याला पंचवीस वर्ष सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी, वय १७ ही अंध असल्याने ती मालेगाव येथील अंध शाळेत शिक्षण घेत होती. शिक्षणादरम्यान सन २०१४ चे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत सदर अंध पीडित मुलगी दात्याणे ता.निफाड या मूळ गावी येथे येत असे.
त्या दरम्यान तिचे वडील वेळोवेळी पीडितेच्या असाह्यतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार करत धमकावत होते. पीडिता शाळेत दाखल झालेवर नियमित वैद्यकिय तपासणी करतांना पीडिता गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पीडितेने सर्वप्रथम आरोपी पित्याच्या लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून ओझर पोलिस ठाण्यात आरोपी पित्याविरूद्द भा.द.वि.कलम ३७६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४,५,६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिकारी भगवान मथुरे यांनी बारकाईने तपास करुन पीडित, तिची आई, मामा तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील डी.एन.ए अहवाल प्राप्त करुन निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल रमेश कापसे यांनी तपास अधिकारी भगवान मथुरे, वैद्यकिय अधिकारी, अंध शाळेचे अधिकारी, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील तज्ञ अशा महत्वपूर्ण अठरा साक्षीदारांची साक्ष नोंदविली व प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणुन पो.हवा.रत्नाकर बागुल यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.एस.बी.कोऱ्हाळे यांनी पित्याला दोषी ठरवत पंचवीस वर्ष सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पीडितेच्या पुनर्वसनासाठी पुरक भरपाई देणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ३५७ ए अन्वये तरतुद करण्याचे निर्देश दिले आहेत.
* सरकार पक्षाला वैद्यकीय पुरावा ठरला निर्णायक
या खटल्याच्या सुनावणी दरम्यान पीडितेसह
तिची आई देखील फितुर झाली होती. तथापी पीडितेची वैद्यकिय तपासणी करणारे व डी.एन.ए तपासणी करणारे व डॉक्टरांची साक्ष आणि अहवाल सरकार पक्षाला पुरक ठरल्याने पित्याविरुध्द गुन्हा शाबीत होण्यास मदत झाली.
ॲड.रमेश कापसे
सहाय्यक जिल्हा सरकारी वकील, निफाड



