
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : कवडीमोल भावात विकल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाला असून कांदा उत्पादकांच्या व्यथा लक्षात घेत तालुक्यातील कापशी (भावडे) ग्रामपंचायतीने एक महत्त्वाचा ठराव मंजूर केला आहे. या ठरावामध्ये शासनाकडे तातडीने कांद्याला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी एकजुटीने केलेल्या या मागणीमुळे आता शासनावर दबाव वाढणार आहे.
ग्रामसभेत शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या ठामपणे मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार हमीभाव मिळावा, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच, स्वस्त दरात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पंधराशे अनुदान तात्काळ द्यावे, केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून दर पाडू नये याचा देखील ठरवत उल्लेख करण्यात आला आहे.
यावेळी सरपंच गयाबाई जाधव, उपसरपंच अनिल भदाणे, अशोक मोरे, चंद्रशेखर भदाणे, तुषार भदाणे, दिवाकर भदाणे, कौतिक भदाणे, सचिन भदाणे, संजय भदाणे, भाऊसाहेब आहेर, प्रभाकर भदाणे, नानाजी भदाणे, दिगंबर भदाणे, व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर ठराव शासनाला पाठवणे साठी ग्रामविकास अधिकारी रुपेश आहेर यांचेकडे देण्यात आला.
प्रतिक्रियाकांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे कांदा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली कांदा दरवाढीसाठी फोन आंदोलन, मोर्चे, रास्तारोको, ठिय्या, सारखी विविध आंदोलन सुरू असून हमीभावासाठी गावागावात ठराव देखील होत आहेत. शासनाने लवकरात लवकर याची दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल. – जयदीप भदाणे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.)
Tags
Onion Farmers


