नाशिक ग्रामीण

कांद्याच्या दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांचे विंचूर येथे रस्ता रोको आंदोलन

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.१० ऑक्टो २०२५ :- कांद्यास मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांचा संताप उसळला असून, या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवार, दि.१० ऑक्टो रोजी विंचूर येथील संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी केले.
सलग पाच महिन्यांपासून उन्हाळी कांद्याला अत्यल्प दर मिळत आहेत. सध्या रांगड्या कांद्याचे दर अवघे दीडशे ते दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले असून, उत्पादन खर्चही शेतकऱ्यांना वसूल करता येत नाही. मे-जून महिन्यापासून साठवून ठेवलेला कांदा बाजारात केवळ ६ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. साठवणूक, मजुरी, वाहतूक अशा सर्व खर्चानंतर शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सरकारने कांद्याच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी निर्यातबंदी व साठा मर्यादा यांसारखे निर्णय घेतल्याने बाजारपेठ कोसळली आहे. त्यामुळे असंतोषित शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला.
यावेळी शेतकऱ्यांनी ‘कांद्याला हमीभाव द्या’ ‘शेतकरी विरोधी धोरणे बंद करा’, ‘शेतकऱ्यांच्या घामाचे मोल द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलनादरम्यान दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी धोरण राबवावे, कांद्याला प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल १५०० रुपये फरकाची रक्कम राज्य सरकारने द्यावी, नाफेड व एनसीसीएफ यांनी खरेदी केलेला कांदा शेतकऱ्याजवळील कांदा विक्री होईपर्यंत बाजारात विकू नये, तसेच पुढे या संस्थांनी दर स्थिरीकरणाच्या नावाखाली खरेदी करू नये, अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय उसाची एकरकमी एफआरपी रक्कम मिळावी, ऊस वजन काटे ऑनलाइन करावेत आणि देवगाव गटातील अतिरिक्त पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, या मागण्यांचाही समावेश होता.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारेपाटील, निफाड तालुकाध्यक्ष गजानन घोटेकर, येवला तालुकाध्यक्ष दरगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष मच्छिंद्र जाधव, देवगाव गटप्रमुख गणेश बडवर, पंकज घोटेकर, दीपक घोटेकर, संदीप घोटेकर, प्रमोद गीते, प्रसाद घोटेकर, मच्छिंद्र आहेर, सोपानराव घोटेकर, विनायक वाघ, अंबादास घोटेकर यांच्यासह परिसरातील शेकडो कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले.

लासलगावचे स.पो.नि.भास्करराव शिंदे यांनी फौजफाट्यासह चोख बंदोबस्त बजावला. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करत पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही आणि सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!