नाशिक ग्रामीणशेती

तहसीलदार चावडे यांना घेराव, बागलाणसह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

बागलाण तालुक्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदार चावडे यांना घेराव

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ

सटाणा दि.30सप्टेंबर2025 : महाराष्ट्रातील यंदाचा अतिवृष्टीचा कहर शेतकऱ्यांच्या आयुष्यावरच घाला ठरला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह बागलाण तालुक्यातील शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून, शेतमाल, दुभती जनावरे, फळबागा, घरे आणि भवितव्य हे सर्वस्व पाण्यात वाहून गेले आहे. हताश शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत तर त्यांच्या कुटुंबियांना दोन वेळच्या भाकरीचीही चिंता भेडसावत आहे. “हा पाऊस जीवनदायी नव्हे तर जीवनहरण करणारा ठरला आहे,” अशा तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला मदत द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे देण्यात आला आहे.

आज सकाळी अकरा वाजता बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण आणि पक्षाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार कैलास चावडे यांना घेराव घालून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी ‘ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, बळीराजाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष केशव मांडवडे म्हणाले, मंत्र्यांच्या तालुक्यांना तत्काळ दुष्काळी जाहीर केले जाते, मात्र लगतच्या इतर तालुक्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाते. हा अन्याय आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काची मदत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, त्याचे भविष्य पाण्यात गेले आहे. सरकारने तातडीने मदत केली नाही तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल. यावेळी दिलेल्या निवेदनात, संपूर्ण महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना तातडीने कमीत कमी हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी. सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी. जनावरांच्या मृत्यूबाबत भरघोस नुकसानभरपाई द्यावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी. नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी किमान १० लाख रुपये मदत द्यावी. दोन वर्ष विकासकामे थांबवून निधी शेतकरी व ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपलब्ध करून द्यावा. पीकविमा कंपन्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदार वर्गासाठी विशेष पुनर्वसन पॅकेज द्यावे. आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात शहराध्यक्ष भारत काटके, छोटू सोनवणे, विजयराज वाघ, सुमित वाघ, महिला तालुकाध्यक्ष उषाताई भामरे, वंदना बिरारी, चेतन वनीस, किरण पाटील, युवराज निकुंभ, संजय वाघ शिरसमणीकर, झिपरू सोनवणे, दिलीप सोनवणे, विलास सोनवणे, जनार्दन सोनवणे, बापू बागुल, अनिल चव्हाण, आबा इंगळे, भाऊसाहेब सूर्यवंशी,

प्रतिक्रिया :
कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शासनाने सरकारने उदासीनता सोडून ताबडतोब मदतीचे हात पुढे करावेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी. अन्यथा नाइलाजाने शेतकर्‍यांसाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल.
– संजय चव्हाण, माजी आमदार, बागलाण

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!