शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरी आणि घरफोडीचा प्रयत्न उघड, दोन अल्पवयीन ताब्यात!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : रविवारी पहाटे दुचाकीची चोरी करून त्याच दुचाकीचा वापर करून दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या तीन अल्पवयीन गुन्हेगारांपैकी दोघांना देवळा तालुक्यातील वरवंडी येथील सतर्क शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यातील एक आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.
ढकांबे, ता. दिंडोरी येथील अविनाश सानप यांच्या मालकीची बुलेट (क्र. एमएच-१५ जेई-७१७२) रविवारी पहाटे ४ वाजता चोरीला गेली होती. त्यांनी तात्काळ दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू असतानाच, चोरट्यांनी त्याच दुचाकीचा वापर करून वरवंडी ता. देवळा येथे घरफोडीचा कट रचला.
तीन अल्पवयीन गुन्हेगार, ज्यात एक १६ वर्षांचा मुलगा, एक १५ वर्षांची मुलगी आणि एक अज्ञात साथीदार, यांनी वरवंडी येथील एका कुलूपबंद घराला लक्ष्य केले. त्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरफोडीचा प्रयत्न सुरू केला.
हा प्रकार शेजारील शेतात कांद्याच्या रोपाला पाणी देत असलेले शेतकरी आबा दौलत वाघ यांच्या लक्षात आला. घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर संशय आल्याने त्यांनी घरात डोकावून पाहिले. आतमध्ये दोन मुलांना चोरी करताना पाहून त्यांनी आरडाओरडा करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान एका मुलाने आबा वाघ यांच्या हाताला चावा घेतला.
आबांच्या मदतीला त्यांचे भाऊ समाधान वाघ धावून आले. या झटापटीत एक मुलगा पळून गेला, तर १६ वर्षीय मुलाला शेतकऱ्यांनी पकडले. त्याच वेळी रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या १५ वर्षीय मुलीलाही पकडण्यात आले. चौकशी केल्यावर तिनेही आपण त्यांच्यासोबत असल्याचे कबूल केले.
शेतकऱ्यांनी तात्काळ देवळा पोलिसांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी येऊन दोन्ही अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी ही दिंडोरी येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे.



