नाशिक ग्रामीण

नांदगावमध्ये बेकायदा गोमांस कत्तलीवर पोलिसांची धडक कारवाई; तिघांना अटक

Nandgaon news

नांदगावमध्ये बेकायदा गोमांस कत्तलीवर पोलिसांची धडक कारवाई; तिघांना अटक
वेगवान मराठी :मारुती जगधने दि 24 August2026
नांदगाव: नांदगाव तालुक्यातील जवळकी गावाच्या शिवारात बेकायदा गोमांस कत्तल व विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नांदगाव पोलिसांनी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने छापा टाकत तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. २२ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नांदगाव पोलिसांनी पंच व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव सुनील जाधव यांच्या उपस्थितीत जवळकी गावाच्या शिवारातील नाल्यालगत छापा टाकला. यावेळी तीन व्यक्ती लाकडी ओंडक्यांवर लोखंडी हत्यारांच्या साहाय्याने मांस कापत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी युसुफ कुरेशी याकुब कुरेशी (वय ५०), रफिक मोहम्मद कुरेशी आणि साहिल रफिक कुरेशी, तिघेही देवगाव रंगारी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले.

कारवाईदरम्यान सुमारे १०५ किलो संशयित गोमांस, अंदाजे २१ हजार रुपये किमतीचे, तसेच मोटारसायकल, वजनकाटा, वजने, लाकडी ठोकळे आणि मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी हत्यारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांसाचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी सीलबंद केले. उर्वरित मांस व संबंधित साहित्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई रमेश राजू सानप यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३९१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे व त्यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर रामा बस्ते करीत आहेत.

टीप : जप्त केलेले मांस हे प्राथमिक तपासात संशयित गोमांस असल्याचे नमूद करण्यात आले असून, त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष रासायनिक/वैज्ञानिक तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!