लोकल बातम्या
वणीची कन्या रवीना गायकवाडने राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत दोन पदके पटकावली

वेगवान नाशिक / सागर मोर
वणी: वणी गावाच्या आदिवासी कन्या रवीना विजय गायकवाड हिने राष्ट्रीय वरिष्ठ आंतरराज्य ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा, २०२५ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत दोन पदकांची कमाई करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. चेन्नई येथे झालेल्या या स्पर्धेत रवीनाने १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक आणि ५,००० मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावून आपल्या अदम्य इच्छाशक्तीचा परिचय दिला आहे.
चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्रातून २३ पुरुष व १५ महिला खेळाडू सहभागी झाले होते. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही, रवीनाने हार मानली नाही. तिचे वडील विजय गायकवाड आणि आई ताईबाई यांच्याकडे धावण्याच्या सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीही, तिने आपले प्रशिक्षक बबलू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव सुरू ठेवला आणि हे यश मिळवले.
रवीनाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे वणी गावात उत्साहाचे वातावरण आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी दि. २९ ऑगस्ट रोजी वणी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात तिचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी वमको बँकेचे चेअरमन महेंद्र बोरा होते.तसेच लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट यांच्या उपस्थितीत .कार्यक्रमात बोलतांना उपसरपंच विलास कड, वणी एपीआय गायत्री जाधव नरेंद्र वड, संतोष रेहेरे,रवि सोनवणे गणेश देशमुख बबीता सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनीमनोगत व्यक्त करत रवीनाचे अभिनंदन केले
रवीनाचा ‘वणी एक्स्प्रेस’ म्हणून गौरव केला आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन मदत करेल, असे आश्वासन दिले.याचवेळी, रवीनाचे प्रशिक्षक बबलू चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना, रवीनाने गावातील लोकांचे आभार मानले आणि आपल्या यशाचे श्रेय आपले प्रशिक्षक आणि आई-वडिलांना दिले. तिने आपल्या पुढील ध्येयांबद्दलही सांगितले. रवीनाने मिळवलेले हे यश केवळ तिचे वैयक्तिक यश नसून, ते वणी आणि परिसरातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.



