नाशिक ग्रामीण

हरवलेला श्लोक..अफवांचा पाऊस… पोलिसांची धडपड…आणि अखेर…

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दि.२३ ऑगस्ट २०२५ :- निफाड तालुक्यातील नांदगावच्या सावकार वस्ती येथे शनिवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. केशव निकम यांचा मुलगा श्लोक (वय ८) हा राहत्या घराजवळून अचानक बेपत्ता झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुलगा दिसेनासा झाल्याचे लक्षात येताच घरच्यांमध्ये धावपळ सुरू झाली.

मुलगा हरवल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांमध्ये बिबट्याने त्याला उचलले असावे अशी चर्चा रंगली. या अफवेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी वनविभागाशी तातडीने संपर्क साधून मुलाचा शोध लावण्याची मागणी केली. मात्र, वनविभागाचा थंड प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच सपोनि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा. सागर आरोटे, अविनाश सांगळे, चंद्रकांत मांजरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात दाट मका पिक असल्याने मुलगा त्यात हरवला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. काही धीट नागरिकांनी मका पिंजून काढली. मात्र, अंधार पडल्याने गावकऱ्यांना पिकात शोध घेण्याची भीती वाटत होती.

पोलिसांनी नागरिकांना धीर देत पुन्हा स्वतः शोधमोहीम राबवली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर श्लोक हा मुलगा मका पिकामध्ये लपलेला अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला सुखरूप बाहेर आणताच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुलगा अतिशय घाबरलेला होता. तो घरातून रागाने बाहेर पडला की? घरच्यांच्या रागामुळे दूर गेला? याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, त्याला झोपेची सवय असल्याने तो पिकात जाऊन झोपी गेला असावा, असा अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला.

या घटनेत पोलिसांच्या तत्परतेमुळे व धाडसामुळे संभाव्य संकट टळले. श्लोक सुखरूप मिळाल्यानंतर निकम कुटुंबीय भावूक झाले व त्यांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. गावकऱ्यांनीदेखील पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपाचे कौतुक केले.

◆ वनविभागाच्या असाही निष्काळजीपणा
नागरिकांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली असता, तेथे यापूर्वी बिबट्या आला होता का? त्याचे ठसे असेल तर त्याचा फोटो पाठवा असे प्रश्न विचारत ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचा’ प्रकार त्यांनी केला. अखेर मुलगा सुखरूप सापडल्यानंतर  रात्री ९.३० वाजता वनकर्मचारी हजर झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

 

 

 

 

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!