नाशिक ग्रामीण
मुलींनो मोबाईल वापरतांना सावधान; सायबर गुन्हेगारी ठरतेय डोकेदुखी
दहिवड येथील जिजामाता विद्यालयात मुलींना सुरक्षेचे धडे

मुलींनो मोबाईल वापरतांना सावधान; सायबर गुन्हेगारी ठरतेय डोकेदुखी
दहिवड येथील जिजामाता विद्यालयात मुलींना सुरक्षेचे धडे
मनोज वैद्य/दहिवड
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे योग असून समाजामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल व सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे, मात्र शाळकरी विद्यार्थिनींनी व मुलींनी याचा वापर करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन देवळा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांनी दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयात केले.

अनेक भौतिक सुविधा या माणसाच्या चांगल्या साठी आहेत मात्र समाज विघातक लोक याचा गैरवापर करून गुन्हेगारी करत असल्याचे चित्र सध्या समाजात निर्माण झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलं-मुली समाविष्ट झाले असल्याने त्यांना अशा वाईट घटनांपासून परावृत्त करावे या उद्देशाने देवळा पोलीस स्टेशनच्या वतीने जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले.

तसेच मुलींनी सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देऊ नये, संशयास्पद मेसेज किंवा लिंक उघडू नये, तसेच “गुड टच व बॅड टच” याची जाणीव ठेवून स्वतःचे रक्षण करावे व अभ्यास करून पालकांचा सन्मान वाढवावा असे यावेळी बोलताना पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी जिजामाता माध्यमिक विद्यालयतील वकृत्व, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच एसएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक सागर सर, दहिवड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वसंत आहिरराव, गणपत सोनवणे, संजय पवार, जिभाऊ पिंपळसे, दादाजी देवरे यांचे सह ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.



