वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१४ ऑगस्ट २०२५ :- सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळसाकोरे शिवारात दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा व सायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकाने विशाल रमेश बनसोडे (२३, सायने बु, ता. मालेगाव), दिलीप अशोक चव्हाण (३०, सोमठाणे, ता. सिन्नर) आणि राहुल नाना चव्हाण (२६, कुटेवस्ती, सायखेडा, ता. निफाड) या तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल, मोबाईल फोन आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दि. १३ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञातांनी घरात प्रवेश केला. कुटुंबीयांना कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत हातातील सोन्याची अंगठी व घरातील महिलांचे अंगावरील तसेच कपाटातील दागिने असा एकूण ३.८४ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. याच वेळी गावातील इतर चार घरांतही घुसून मारहाण व चोरीचा प्रयत्न करण्यात आला.
चौकशीत आरोपींनी रायगड व मालेगाव येथील अजय एकनाथ चव्हाण (असारे, ता. खालापूर), आकाश पांजराव चव्हाण (होराळे, ता. खालापूर), सोमनाथ भानुदास चव्हाण (भिलवली, ता. खालापूर) आणि रोहिदास उर्फ बन्नी चव्हाण (अजंग वडेल, ता. मालेगाव फरार) या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात ही टोळी मुंबई, सातारा, रायगड, पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, बुलढाणा, सोलापूर, ठाणे आदी जिल्ह्यांत घरफोडी, चोरी, दंगा-दुखापत, अपहरण, मद्यबंदी अशा तब्बल २३ गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले. आरोपी भाजीपाला, मोबाईल अॅक्सेसरीज व चायना वस्तू विक्रीच्या बहाण्याने मोटारसायकलवरून खेड्यांची पाहणी करून नंतर एकत्र येऊन दरोडे टाकत असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, सायखेडा पोलीस ठाण्याचे सपोनि विकास ढोकरे, स्था.गु.शा.चे स.पो.नि योगिता कोकाटे, पोलीस अंमलदार हेमंत गरूड, सचिन धारणकर, दीपक गुंजाळ, हेमंत गिलबिले, प्रितम लोखंडे, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, दत्ता माळी व नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.