बागलाण तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मोटर, जलपरी चोरांच्या हातात पोलीसांनी ठोकल्या बेड्या,एक लाख तेरा हजारांचा मुद्देमाल जप्त, सटाणा पोलीसांची धमाकेदार कामगिरी

वेगवान नाशिक /तुषार रौंदळ
विरगाव दि. 12 ऑगस्ट2025 :- बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर पम्प चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळत 1 लाख 13 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.सटाणा पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील लखमापूर, धांद्री, अजमेर सौंदाणे, ब्राम्हणगाव या परिसरातून इलेक्ट्रिक मोटर व जलपरी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. यात लखमापूर येथील शेतकरी अनिल भामरे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविषयी तक्रार दाखल केली होती.गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश ठोके यांच्याकडे देण्यात आला होता. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे आदेशन्वये अप्पर पोलीस अधीक्षक तेघबीर सिह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी तपास पथक तयार केले.
सादर गुन्ह्याच्या तपासात संशयित सचिन दिलीप चव्हाण- धांद्री,चंद्रकांत नारायण आहिरे – ब्राम्हणगाव, हसीम जमाल सैयद – ब्राम्हणगाव यांना ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवत चौकशी केली असता सादर गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली असून देविदास नानाजी वाघ – ब्राम्हणगाव, चंद्रकांत विलास आहिरे – ब्राम्हणगाव अशी अजून दोन नावे पुढे आली आहेत. सादर आरोपीच्या ताब्यातून 73 हजार रुपये किंमतीच्या एकूण 11 इलेक्ट्रिक पंप, जलपरी व गुन्ह्यात वापरण्यात आलेली 40 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकल असा एकूण 1 लाख 13 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात तपास पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश ठोके करीत आहेत.तर तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, दत्तात्रेय राऊत, पोलीस हवालदार रविंद्र खांडेकर, नितीन जगताप, भूषण सूर्यवंशी, सिकंदर कोळी, कदम दादा, आहेर दादा, दवंडे दादा यांचा समावेश होता.



