वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.११ ऑगस्ट २०२५ :- पिंपळगाव नजीक येथील सर्व्हेश्वर मंदिरासमोरील विहिरीत एका ४३ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला सौ.अनुजा अशोक अब्बड, रा. शास्त्रीनगर, पिंपळगाव नजीक या दि.१० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता पती बाथरूममध्ये असताना बाहेरून कडी लावून, तसेच घराच्या दरवाजाला कुलूप लावून त्या निघून गेल्या. संबधित महिला मनोरुग्ण असून यापूर्वीही दोन – तीन वेळा त्या घराबाहेर गेल्या होत्या, मात्र एक – दोन दिवसांत परत आल्या होत्या. परिसरात शोध घेतल्यानंतर त्या मिळून न आल्याने लासलगाव पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पिंपळगाव जवळील सर्व्हेश्वर मंदिरासमोरील विहिरीत एक महिला पालथी अवस्थेत पाण्यात तरंगताना दिसल्याची माहिती मिळाली. तिच्या पतीसह नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता महिलेच्या अंगावर केसरी – लाल रंगाचा गाऊन होता. त्यावरून संबधित महिलेची ओळख पटली. महिलेचे पती आनंद अब्बड यांच्या खबरीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात अ.मृ. नोंद क्र. ४२/२०२५ भा.न्या.सं. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. स.पो.नि. भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा उत्तम गोसावी अधिक तपास करीत आहेत.