शेती

कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किंमत देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा – मंत्री छगन भुजबळ

कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किंमत देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा - मंत्री छगन भुजबळ

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दि.२० जुलै 2025 लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. अनेकदा कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

लासलगाव बाजार समितीच्या नूतन संकेतस्थळाचे आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बाजार समितीच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, उपसभापती संदीप दरेकर, संचालक सुवर्णा जगताप, डॉ.श्रीकांत आवारे, राजेंद्र डोखळे, तानाजी आंधळे, गणेश डोमाडे, रमेश पालवे, छबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे,महेश पठाडे, प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसलीदार विशाल नाईकवाडी, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सरपंच योगिता पाटील, उन्मेष डुंबरे, व्यापारी जव्हेरीलाल बम्हेचा, नंदकुमार डागा, संतोष पलोड, राजेंद्र चाफेकर, उत्तमराव नागरे, बालेश जाधव, मधुकर ढोमसे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान २२५० रुपये आधारभूत किंमत मिळावी. ३ हजार रुपयांपर्यंत भाव असेपर्यंत कुठलेही निर्बंध शासनाने ठेऊ नये तसेच ३ ते ४ हजार भाव झाला की मिनिमम एक्सपोर्ट प्राईस लावावी तसेच ४ ते ५ हजार रुपयांच्या पुढे भाव गेला तर निर्यात मूल्य लावण्यात यावे तसेच ५ हजारांहून अधिक दर गेल्यास निर्यात बंदी करावी अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्यात आली असून शेतकऱ्याच्या शेतमालाला आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीला शासनाच्या वतीने अ (४ तारांकित) वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार सुभाषनगर बाजार समितीचा प्रश्न मार्गी लागला असून खानगाव नजीक या उपबाजाराच्या जागेचा प्रश्नाबाबत सचिवांशी चर्चा झाली असून हाही प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून बाजार समितींच्या विकासासाठी आवश्यक ती मदत शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, येवला, निफाडसह परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे. यामध्ये लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. मात्र अनेकदा कांद्याला भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागा कांदा प्रक्रिया उद्योगासाठी आरक्षित करण्यात आली असून लवकरच हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे नूतनीकरण करण्यात येत आहे. लासलगाव बाह्यवळण रस्त्याचे, लासलगाव विंचूर खेडलेझुंगे १३२ कोटी रुपयांचा रस्ता काँक्रीटीकरण, पिंपळद ते येवला ५६० कोटी रुपयांचे चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण, लासलगाव बाजार तळातील ५ कोटी रुपयांचा पूल, लासलगाव उपजिल्हा रुग्णालय यासह अनेक कामे मतदारसंघात सुरू आहे. ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य देखील तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!