नाशिक ग्रामीणशेती

कांद्याच्या भावासाठी शेतकरी आक्रमक, शिवतीर्था जवळ एकत्र येत रास्ता रोको,सरकारच्या धोरणांचा निषेध

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.१५सप्टेंबर २०२५ :- कांद्याचा गडगडलेला बाजारभाव, नाफेडकडुन होत असलेली चुकीची खरेदी बंद करावी, कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीबरोबरच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व निद्रिस्त सरकारी व्यवस्थेला जाग आणण्यासाठी सोमवार(दि.१५) रोजी विविध शेतकरी संघटनांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होत येथील राष्ट्रीय महामार्गावरील शिवतीर्थजवळ रास्ता रोको आंदोलन छेडले.यावेळी रस्त्याच्या चोहोबाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तहसीलदार कैलास तावडे व पोलीस निरीक्षक योगेश पाटील आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बागलाण तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था हि उन्हाळी कांद्यावरच अवलंबून असुन उन्हाळी कांदा उत्पादनात आघाडीवर आहे.मात्र चालू वर्षी कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे.त्याची दखल घेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाजार समितीचे संचालक डॉ.राहुल सोनवणे,शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी संघटना,रयत क्रांती संघटना,कांदा उत्पादक संघटना व शेतकऱ्यांनी एकत्रित येत आंदोलनाचा इशारा दिला होता.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडले.शिवतीर्थावर छेडलेल्या ह्या आंदोलनामुळे साक्री-शिर्डी , सटाणा-मालेगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती
यावेळी बाजार समिती माजी सभापती संजय सोनवणे,संचालक डॉ.राहुल सोनवणे,शिवसेनेचे जेष्ठ नेते लालचंद सोनवणे,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी,रयत क्रांती संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. शासकीय धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त करीत कांदा बाजारभावाबाबत शासनाने तात्काळ दीर्घकालीन धोरण न स्वीकारल्यास शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल असा इशारा दिला. नाफेड एनसीसीएफची कांदा विक्री तात्काळ थांबवण्यात यावी,कांद्याला जास्त बाजारभाव मिळावा,कांदा निर्यात धोरण बदलण्यात यावे तसेच कर्जमाफी जाहीर करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे,भास्कर बागुल,देविदास अहिरे, सुभाष शिंदे,गणेश काकुळते,संदीप सोनवणे, प्रवीण अहिरे,यशवंत गुंजाळ,नरेंद्र जाधव, वैभव वाघ,ज्ञानेश्वर जाधव,बापू जाधव, भिका सूर्यवंशी,दादाजी सूर्यवंशी,उमेश खैरनार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राउत , गोपनीय शाखेचे सिकंदर कोळी, जितेंद्र बोरसे, नितिन जगताप,भुषण सुर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!