नाशिक ग्रामीण

वनविभागाच्या कार्यक्षेत्रातच बिबट्याचा धुमाकूळ, वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, शेतकरी मेटाकुटीला

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
_____________

सटाणा ता. १९ सप्टेंबर २०२५ : – ताहराबाद वनविभागाच्या कार्यक्षेत्रात बिबट्याचा धुमाकूळ वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. या भागातील तिसरी घटना घडली असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. रात्री साधारण नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने एका पोल्ट्री फार्म हाऊसवर लोखंडी जाळी वरुन प्रवेश करीत अंदाजे शंभरहून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना नांदिन येथे घडली यामुळे पोल्ट्री व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

 

बागलाण तालुक्यातील नांदिन येथील शिवारात सरलाबाई कारभारी शिंदे यांच्या शेतातील गट क्रमांक १६४ मध्ये शेतीला जोडधंदा म्हणून ४ हजार पाचशे कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म उभारणी केला आहे. शेतीसह पोल्ट्री व्यवसायातून शिंदे कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते. दरम्यान गुरुवार (ता.१८) रात्री साधारण नऊ वाजेच्या सुमारास कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म मधुन जोरजोराने आवाज येऊ लागल्याने मुलगा सतिश व निलेश यांनी पोल्ट्रीच्या दिशेने धाव घेतली. पोल्ट्रीत पाहताच त्यांची पायाखालची जमीन सरकली समोर बिबट्याने कोंबड्यांचा फडशा पाडला होता. सतीशने कुठलीही विचार न करता थेट पोल्ट्रीचा दरवाजा उघडला व बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले. मात्र चवताळलेल्या बिबट्याने सतीशवर हल्ला करण्याचा प्रयत्नात असतांनाच भाऊ निलेश शिंदे यांने समयसूचकता बाळगून बाहेर ओढले बिबट्यावर मातीचा मारा व आरडाओरडा केला आणि बिबट्याने तेथून जंगलात धूम ठोकली. सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते बंटी पाटील यांनी तातडीने ताहराबाद वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कळविली.

वनकर्मचाऱ्यांनी रात्री भेट दिली होती पण फक्त पाहणी करून निघून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या भागातील ही तिसरी घटना घडली असतानाही वनविभागाच्या वनरक्षकाकडून ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. शेतकऱ्यांची संतापाची भावना बघता दोन वाजेपर्यंत सदर पोल्ट्री बाहेर वनमजूरांकडून पिंजरा बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बसविलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद होणार का..? याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागुन आहे.

प्रतिक्रिया
_______

…एकिकडे शेतीच्या मालासह कांद्याला भाव नाही पोल्ट्री व्यवसायातून थोडेफार पैसे मिळतील अशी अपेक्षा होती मात्र बिबट्याने पोल्ट्रीतील कोंबड्यांचा फडशा पाडला. बिबट्याला हुसकावून लावताना माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नात असतांनाच भाऊ निलेशने मला ओढले नाहीतर मलाच शिकार केले असते व ताहराबाद वनविभागाने माझाच पंचनामा केला असता. ही नुकसान भरून निघणार नाही आमची दिवाळी सुध्दा अंधारातच जाईल असे वाटते.

निलेश कारभारी शिंदे, पोल्ट्री व्यावसायिक नांदिन

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!