घाटमाथ्यावरील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात बोलठाण येथे प्रहारचे ‘सरण आंदोलन’
Nandgaon news

घाटमाथ्यावरील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात बोलठाण येथे प्रहारचे ‘सरण आंदोलन’
वेगवान मराठी :दि 18 August2026
बोलठाण : घाटमाथ्यावरील विविध रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रस्त्यांच्या तातडीने दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने बोलठाण येथे सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदगाव यांच्या विरोधात ‘सरण आंदोलन’ करण्यात आले.
घाटमाथ्यावरील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहतुकीसाठी नागरिक, शेतकरी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून शेतमाल वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी आंदोलकांनी प्रतीकात्मक सरण तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. घाटमाथ्यावरील सर्व रस्त्यांची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत आणि रस्त्यांची कायमस्वरूपी सुधारणा करावी, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेने केली.
रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.



