
नांदगाव आगाराचा स्वातंत्र्य दिनी कर्मचाऱ्यांचा गुणगौरव
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नांदगाव आगार, नाशिक विभाग येथे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी तसेच कर्मचारी पाल्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे जुलै महिन्यात नाशिक विभागातील एकमेव नफ्यातील आगार ठरल्याबद्दल नांदगाव आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले
आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने, प्रामाणिकपणे व जबाबदारीने केलेल्या कार्यामुळे आगाराने नफ्याची उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाबद्दल कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ४६ चालकांना प्रत्येकी रु. १,५००/- रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच ३० गुणवंत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.**
यावेळी कर्मचारी पाल्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भेटवस्तू व पुष्प देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या योगदानाचीही दखल घेण्यात आल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या सर्व पुरस्कार व सत्काराचे वितरण आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे, स्थानक प्रमुख सतीश इप्पर, तसेच नांदगाव शहरातील ज्येष्ठ प्रवासी मित्र यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नांदगाव आगाराच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून भविष्यातही अशीच सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे आवाहन केले.प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर व विश्वासार्ह सेवा देणे हेच एसटीचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी कर्मचारी करत असलेल्या मेहनतीचे हे यशस्वी फलित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले
दरम्यान, आमदार सुहास कांदे यांनी भ्रमणध्वनीद्वारे नांदगाव आगारातील सर्व अधिकारी, कर्मचारी व गुणवंत पाल्यांचे अभिनंदन करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आगाराने नफ्यात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून भविष्यातही नांदगाव आगाराची अशीच प्रगती होत राहावी, अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमामुळे अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नांदगाव आगाराने मिळविलेली ही नफ्याची कामगिरी ही केवळ आर्थिक उपलब्धी नसून, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे, शिस्तीचे, संघभावनेचे आणि प्रवाशांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
नांदगाव आगाराच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही आगाराने प्रगतीची हीच परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



