नाशिक ग्रामीण

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विनंतीची दखल; सुरक्षेसाठी भावडबारी घाटातील वाहतूक दोन दिवस बंद, पर्यायी मार्ग निश्चित

वेगवान नाशिक  / बाबा पवार

देवळा : सटाणा–देवळा–मंगरूळ राष्ट्रीय महामार्ग (NH-752G) वरील भावडबारी घाटात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. घाटाचे काम नुकतेच पूर्ण झाले असले तरी, आगामी ४८ तासांत महाराष्ट्र शासनाकडून सतर्कतेचा (अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर घाटात पुन्हा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी प्रशासनाकडे तातडीने संपर्क साधला होता. अतिवृष्टीचा इशारा आणि घाटाची सद्यस्थिती लक्षात घेता, पुढील ४८ तास भावडबारी घाट वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवावा आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी, अशी अधिकृत विनंती आमदार डॉ. राहुल आहेर यांनी प्रशासनाकडे केली होती.

अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विनंतीची आणि स्थानिक परिस्थितीची गंभीर दखल घेत नाशिकचे अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी मोटार वाहन अधिनियमांतर्गत भावडबारी घाटातील वाहतूक पुढील दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

बंदचा कालावधी: दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० पासून रस्ता बंद

दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपासून  ते दिनांक ०८ जुलै २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत घाटातील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. असा शासकिय आदेशात म्हंटल असले तरी, सुरक्षिततेच्या दृष्टीने आज दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास रस्ता बंद करण्यात आला आहे.

असा असेल पर्यायी मार्ग (डायव्हर्शन):

घाटातील वाहतूक बंद असल्यामुळे वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. देवळा शहरात येणारी आणि जाणारी वाहतूक आता देवळा शहरातील पांचकंदिल वरून मालेगाव नाका – सौंदाणे फाटा/पिंपळगाव वाखारी – मेशी फाटा – धोबी घाट – खारी फाटा – देवळा फाटा ते मुंबई-आग्रा हायवे या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या मार्गांवर तात्काळ दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आमदारांचे नागरिकांना आवाहन

“सर्व नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या कालावधीत भावडबारी घाटाचा वापर पूर्णपणे टाळावा. तसेच तालुक्यातील डोंगरभागात राहणाऱ्या नागरिकांनी देखील हवामानाचा अंदाज घेऊन काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे,” असे नम्र आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले आहे.

नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आपत्कालीन परिस्थितीनुसार या आदेशात बदल करण्याचे अधिकार राखीव आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव लागू केलेल्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ आणि ‘मोटार वाहन अधिनियम, १९८८’ मधील तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तरी सर्व वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!