नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

खड्ड्यांनी महामार्गाची चाळण; ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक त्रस्त

Nandgaon News

खड्ड्यांनी महामार्गाची चाळण; ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक त्रस्त

वेगवान मराठी | दिनांक : ६ जुलै २०२६
मारुती जगधने |

नांदगाव : नांदगाव ते चाळीसगाव दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-753J ची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून अपघातांची शक्यता वाढली आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे व गवत वाढले असून अनेक ठिकाणी ही झुडपे रस्त्यालगतच आली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण जात आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडाझुडपांमुळे दृश्यमानता कमी झाली असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

स्थानिक नागरिक, वाहनचालक तसेच लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाकडे रस्त्यावरील खड्डे बुजविणे व झाडाझुडपांची छाटणी करण्याबाबत निवेदने दिली आहेत. मात्र याकडे संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे लाखो रुपयांचा खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या महामार्गाची देखभाल होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी तसेच कडेला निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून किरकोळ अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाने आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने दखल घेऊन खड्डे बुजविणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची काटेरी झुडपे हटविणे तसेच महामार्ग सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!