न्यायडोंगरीत HPV लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेगवान मराठी : मारुती जनाधने
दि . 20 मार्च 2026
न्यायडोंगरी (ता . नांदगांव जि . नाशिक ) मुलींमध्ये गर्भाशयमुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ न्यायडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला.
सुरुवातीला विविध गैरसमज आणि अफवांमुळे मुली लस घेण्यास पुढे येत नव्हत्या. मात्र आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविकांनी व्यापक जनजागृती केल्यामुळे पालक व मुलींमध्ये जागरूकता निर्माण झाली. परिणामी अनेक मुलींनी उत्स्फूर्तपणे लस घेतली असून इतरांनाही लस घेण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे. नांदगाव तालुक्यातील हा पहिला यशस्वी उपक्रम ठरला आहे.
भारतामध्ये गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग हा महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सामान्य कर्करोग असून दरवर्षी सुमारे १.२३ लाख नवीन रुग्ण आढळतात, तर सुमारे ७७ हजार महिलांचा मृत्यू होतो. १५ ते ४४ वयोगटातील महिलांमध्ये हा प्रमुख कर्करोगांपैकी एक आहे. या आजाराच्या ९५% प्रकरणांमध्ये HPV संसर्ग कारणीभूत असतो. लसीकरण आणि नियमित तपासणीद्वारे हा आजार टाळता येऊ शकतो.
शासनामार्फत “गार्डासिल” लस मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी लस घेतलेल्या मुली व त्यांच्या पालकांचे स्वागत करण्यात आले तसेच जनजागृती करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र न्यायडोंगरीतर्फे ही मोहीम नियमित सुरू राहणार असून जास्तीत जास्त मुलींनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



