
नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव : दि २७ जानेवारी 2026
नांदगाव–मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन व २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास नांदगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर मदनराव हिरे, उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, शिवसेना शहरप्रमुख सुनील जाधव, रिपाई शहराध्यक्ष महावीर जाधव, ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम, मारुती जगधने, सुरेश शेळके, संजय मोरे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरजमल संत आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. २६ जानेवारी रोजी देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच पत्रकार दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाने हा स्तुत्य उपक्रम राबवला.
ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा सन्मान करणे व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे योगदान मोलाचे आहे, या भावनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिकांना नगराध्यक्ष सागर हिरे, उपनगराध्यक्ष राजेश शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष सागर हिरे यांनी डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. पत्रकारिता केवळ बातम्यांपुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पत्रकार संघ करत आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद करत सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार मारुती जगधने यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनावर आधारित कविता सादर करून त्यांच्या संघर्षाला नतमस्तक होणे हाच खरा सन्मान असल्याचे सांगितले.
या सन्मान सोहळ्यास ज्येष्ठ नागरिक, पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी मिळालेल्या या सन्मानामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डिजीटल पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नाना आहिरे यांनी केले,



