देवळा तालुक्यात मुसळधार पाऊसाचा हाहाकार; आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, सरसकट पंचनाम्याचे आदेश

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून, यात देवळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतांना तलावाचे स्वरूप आले असून, अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून निघाली आहे. मक्याचा कोरडा चारा, कणसे शेतात तरंगताना दिसत आहेत. तसेच लागवड केलेल्या लाल कांद्याचे आणि कांदा रोपवाटिकेचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांच्या या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी आज (दि. २७) विविध गावांना भेटी दिल्या. त्यांनी काचणे, कणकापूर, खर्डे, भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ, सरस्वतीवाडी, माळवाडी, फुलेमाळवाडी या गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
अति प्रमाणात झालेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी जमिनी उफळून निघाल्या असल्याने सर्वत्र चिखल झाला आहे. शेतात जाण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ताच नसल्याने कुठे चिखल तुडवत तर कुठे मोटारसायकल ने जात आमदार डॉ. आहेर यांनी नुकसानीची पाहणी केली.

यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, अडीच ते तीन हजार रुपये प्रतिकिलो दराने विकत घेतलेले कांदा बियाणे पूर्णपणे खराब झाले आहे. वर्षभरासाठी साठवलेला कोरडा चारा शेतात पाण्यावर तरंगत आहे, तर मक्याचे कणीस सडून गेले आहे. या पावसाने फळबागांचे, भाजीपाल्याचे अशा सर्वच पिकांचे मोठे नुकसान केले आहे.
सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश ;
खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पुढील रब्बी हंगामाचे नियोजनही पावसामुळे बिघडले आहे. तालुक्यात सर्वत्र झालेले अतोनात नुकसान पाहता आमदार डॉ. राहुल आहेर यांनी अधिकारी वर्गाला तात्काळ सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले.



