ताहराबाद वनपरिक्षेत्रात झाडांची कत्तल करून खुलेआम होते वाहतुक

वेगवान नाशिक /तुषार रौंदळ
विरगांव दि. 3जुलै 2025: ताहराबाद वनपरिक्षेत्रात सध्या अवैध वृक्षतोडीने उच्छाद मांडला असून, दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करून लाकडाची खुलेआम वाहतूक होत असल्याचे भयावह चित्र समोर येत आहे. यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पर्यावरणप्रेमी आणि सजग नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असून, काही क्षेत्रे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. अशा पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील शेत बांधांवर उभ्या असलेल्या लिंब, चिंच, आंबा यांसारख्या जुना डेरेदार वृक्षांची तोड बिनधास्तपणे सुरू आहे. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्चून ‘वृक्षलावा, वृक्ष वाचवा’ मोहिमा राबवत असताना दुसरीकडे मात्र आधीच उभ्या असलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असल्याने हा विरोधाभास अधिकच ठळकपणे जाणवू लागला आहे.
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी विना क्रमांकाची वाहने रस्त्यावरून लाकडाची वाहतूक करताना दिसून येत आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही वाहतूक मुख्य रस्त्यावरून उघडपणे चालते आणि त्याकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. हे लाकूड प्रामुख्याने वीटभट्ट्यांवर वापरण्यात येत असल्याने मागणीही वाढली आहे, आणि त्यातूनच वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढते आहे.
या संपूर्ण व्यवहारामागे एक आर्थिक साखळी कार्यरत असल्याचा संशय बळावत असून, काही वन अधिकाऱ्यांच्या संगनमताचे आरोपही नागरिकांतून व्यक्त होत आहेत. थोडक्याच लाभासाठी चिरीमिरी घेतली जात असल्याच्या तक्रारी ऐकू येत असून, या वृक्षतोडीला अशा प्रकारचा मूक पाठिंबा मिळतो आहे.
दरम्यान, तालुक्यातील लखमापूर–नामपूर आणि काकडगाव–वडनेर खाकुर्डी या मार्गांवर रस्ते सुधारणा कामे सुरू असून, रस्त्यावरील अडथळा ठरणारी अनेक जुनी झाडे तोडली जात आहेत. विशेष म्हणजे, या झाडांची कोणतीही मोजणी किंवा नोंद न करता लाकडांची थेट वाहतूक सुरू असल्याने हे लाकूड चोरट्यांसाठी ‘कव्हर’ ठरत आहे.
शासन दरवर्षी वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करत असले तरी झाडांचे संरक्षण करणारी यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे विदारक वास्तव उघड होत आहे. रोज झाडांची अवैधपणे कत्तल होत असताना, प्रशासनाचे दुर्लक्ष ही अधिकच गंभीर बाब आहे.
निसर्गाचा समतोल बिघडत असून, हवामान बदलाचे दुष्परिणामही यामुळे वाढू शकतात. पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी याविरोधात आवाज उठवून संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
चौकट :-
पर्यावरणप्रेमींची मागणी..
“अवैध वृक्षतोड त्वरित थांबवावी; दोषींवर कडक कारवाईची गरज”
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाच्या समतोलावर विपरीत परिणाम होत असून, भविष्यातील पिढ्यांच्या दृष्टीनेही ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरेने हस्तक्षेप करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करून जंगलसंपत्तीचे रक्षण करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी व जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.



