सांगवी फाटा येथे स्विफ्ट कारचा भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी

सांगवी फाटा येथे स्विफ्ट कारचा भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी
मनोज वैद्य/देवळा
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर देवळा तालुक्यातील उमराणे गावाजवळील सांगवी फाटा येथे काल रात्री बारा वाजता स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला असून शिवप्रसाद हॉटेलसमोरील रस्त्यावर ही कार अचानक घसरून चक्क पाच पलट्या मारत रस्त्यावर आडवी पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकवरून मालेगावच्या दिशेने जाणारी स्विफ्ट (क्र. MH 14 FC 2675) अचानक नियंत्रण सुटल्याने उलटली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच सोमा कंपनीचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

त्या वेळी जोरदार पाऊस सुरू असल्याने बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला होता. तरीही नागरिकांच्या मदतीने कारमधील पाच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी तिघे प्रवासी सुखरूप तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बजरंग ॲम्बुलन्सचे चालक गणेश पवार यांच्या मदतीने जखमींना तातडीने मालेगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सांगवी फाटा परिसरात अशाप्रकारचे अपघात वारंवार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या भागात पूर्वीही अनेक अपघात झाले असून काहींचा बळीही गेला आहे. स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.



