नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला राखीव,राजकीय गणिते बदलणार !

सटाणा दि.६आक्टोबर २०२५ :-
सटाणा नगर परिषदेच्या होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षपदासाठी इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षण निघाले आहे . यामुळे निवडणूक लढण्यासाठी अनेक मातब्धबरांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते मात्र आता या आरक्षणामुळे मातब्बरांना फटका बसला आहे. गेल्या वर्षभरापासुन तयारी करित असलेले माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनिल मोरे , सटाणा बाजार समितीचे माजी उपसभापती श्रीधर कोठावदे यांचा हिरमोड झाला आहे. पुरुष इच्छुकांना आता दह्याची तहान ताकावर भागवावी लागणार आहे इच्छुक असलेल्याना आता आपल्या परिवारातील महिलांना चाल द्यावी लागण्याची वेळ आली आहे.
सन २०१६ मध्ये थेट नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण पदासाठी आरक्षण होते. त्यावेळी सुनिल मोरे यांनी विजय संपादन केला होता. यानंतर तब्बल दहा वर्षानंतर नगर थेट नक्षराध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे. यामुळे मोठी चुरस निर्माण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन गुडघ्याला बांशिंग बांधुन तयार असलेले इच्छुकांचा यामुळे हिरमोड होणार आहे. आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागणार आहे.
थेट नगराध्यक्ष पदासाठी इतरमागास प्रवर्ग महिला राखीव..
आरक्षण निघाल्याने आता पुरूषांऐवजी महिलांना पुढे करावे लागणार आहे. यामुळे या पदासाठी आता अनेकांना आपले राजकारणातील पत्ते बदलावे लागणार आहेत. परिणामी कोणते चेहरे नव्याने पुढे येणार या विषयी शहरात अटकळ बांधली जात आहेत. सटाणा नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला नगराध्यक्षा म्हणून सौ. उत्तराताई अभिमन सोनवणे यांनी बहुमान मिळविला आहे. सन १९९६ ते
१९९७ या काळात त्यांनी शहराचे नगराध्यक्षपद भुषविले आहे…
यानंतर महिला नगराध्यक्षा म्हणून सौ. सुमनताई दगाजी सोनवणे यांनी सन २०११ ते २०१३ मध्ये, कौशल्याताई पांडूरंग सोनवणे सन २०१३ ते २०१४, सुशिलाताई दादाजी रौंदळ २०१४ तर स्वर्गीय सुलोचना कांतीलाल चव्हाण यांनी सन २०१४ ते २०१६ या काळात चार महिलांनी नगराध्यक्षा पदाचा कामकाजाचा अनुभव घेतला आहे.



