वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.१६ ऑगस्ट २०२५ :- केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ उत्साहात पार पडला.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायती अशा तब्बल २३३० ठिकाणी एकाचवेळी, ‘आम्ही कोणत्याही प्रकारचे नशापदार्थ सेवन करणार नाही आणि इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करू. नशामुक्त, निरोगी आणि सक्षम भारत घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू’ अशी शपथ घेण्यात आली. या ऐतिहासिक उपक्रमात तब्बल ४ लाख ६६ हजार विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, महिला बचत गट, पोलीस अधिकारी व कर्मचारी, समाजसेवक आणि राजकीय पदाधिकारी यांनी एकत्रित सहभाग नोंदवला. शाळा, महाविद्यालयांची मैदाने, ग्रामपंचायतींची आवार व सभागृह देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमून गेले. तरुणाई ही राष्ट्राची खरी ताकद असल्याचे अधोरेखित करताना, विद्यार्थ्यांनी या अभियानातून अंमली पदार्थांच्या विरोधात उभे राहण्याचा दृढ संकल्प केला. या अभियानांतर्गत जिल्ह्यात रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, स्पर्धा, तसेच सोशल मीडियावर जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत युवकांसह सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून समाजहितासाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.