
शिर्डीला आलेल्या ओडिशातील दोन नागरिकांचे अपहरण; मालेगाव पोलिसांची धाडसी कारवाई
वेगवान मराठी : मारुती जगधने
॥दिनांक: 18 ऑक्टोबर 2025 ॥
ठिकाण: मालेगाव (जि. नाशिक)
शिर्डी येथे दर्शनासाठी आलेल्या ओडिशा राज्यातील दोन नागरिकांचे अपहरण करून खंडणीसाठी एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्याच्या प्रकरणाचा मालेगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून पीडितांची सुखरूप सुटका केली.
घटनेचा तपशील
ओडिशा राज्यातील कटक जिल्ह्यातील टी. पी. प्रसाद राजू (29, चालक) आणि त्याचा मित्र जालंदर पोडाल (25) हे 10 ऑक्टोबर 2025 रोजी शिर्डी दर्शनासाठी आले होते. समाधान निंबा देवरे (रा. मेहुणे, ता. मालेगाव) आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना धुळे टोलनाका परिसरातून फसवून अपहरण केले. आरोपींनी दोघांना एका हॉटेलमध्ये डांबून ठेवून मारहाण केली आणि 2020 मध्ये घेतलेल्या पैशांच्या परतफेडीच्या बहाण्याने दबाव आणला.
लुटलेला ऐवज
पीडितांकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे ₹40,000 उकळले गेले, तसेच त्यांची KIA Carnival कार (किंमत ₹7 लाख) आणि दोन मोबाईल फोन (₹30,000) असा एकूण ₹7.70 लाखांचा ऐवज बेकायदेशीररीत्या काढून घेण्यात आला.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. आरोपी पीडितांना घेऊन पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अटक आरोपी
समाधान निंबा देवरे (34, व्यवसाय-शेती)
रोशन शिवाजी आहिरे (21, व्यवसाय-ट्रक ड्रायव्हर)
सोमनाथ रविंद्र आहिरे (22, व्यवसाय-मजुरी)
गणेश गोविंद मेंडायत (24, व्यवसाय-मजुरी)
शिवम कैलास पैठणकर (22, व्यवसाय-मजुरी)
सर्व रा. मेहुणे, ता. मालेगाव
पुढील कार्यवाही
या प्रकरणी भा.दं.वि. कलम 364(अ), 323, 504, 506, 34, 170(2) आणि 135(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
- ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजवीर शिंग, आणि उपविभागीय अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक तुषार भामरे, दामोदर काळे, हवालदार रतिलाल वाघ, अमोल शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली.



