मुसळधार पावसामुळे नांदगाव–मनमाड परिसरात पूरस्थितीची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना नगरपालिकांची जाहीर सूचना – सावधगिरी बाळगावी, स्थलांतरित व्हावे
Nandgaon Manmad news
मुसळधार पावसामुळे नांदगाव–मनमाड परिसरात पूरस्थितीची शक्यता
नदीकाठच्या नागरिकांना नगरपालिकांची जाहीर सूचना – सावधगिरी बाळगावी, स्थलांतरित व्हावे
वेगवान मराठी : मारुती जगधने
[दि. 27 सप्टेंबर 2025 ]
नांदगाव/मनमाड – सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव आणि मनमाड शहरासह पंचक्रोशी भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नांदगाव आणि मनमाड नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना जाहीर इशारा देण्यात आले असून नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरिकांनी सावध राहून तत्काळ स्थलांतर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धरणे भरून वाहू लागली
मनमाड शहरालगतचे वाघदर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्यामुळे पांझन, रामगुळणा नदीला पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच नांदगाव शहर परिसरातील शाकंभरी नदीत पाणी वाढत असून लेंडी नदीलाही पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, असे नगरपालिकांकडून आवर्जून सांगण्यात आले आहे.
दरम्यान नांदगाव शहर हिसवळ खुर्द, हिसवळ बुद्रुक, भालूर, नागपूर ,बानगाव, दहेगाव ,साकोरा, पोखरी,जळगाव खुर्द ,जळगाव बुद्रुक ,वडाळी सोयगाव दहेगाव धरण,मन्याड नदी परिसर नांदगाव पंचक्रोशीतील गावांना मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेती पिकाचे अतोनात नुकसान होत आहे नांदगाव तालुक्यात पाऊस मुक्कामी असल्याने नागरिकांनी रात्रीचे सावधगिरी बाळगावी असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे .
प्रशासनाचे आवाहन
नगरपालिका प्रशासनाने कळवले आहे की –
- नदी–नाल्याजवळ अनावश्यक गर्दी करू नये.
- धरण व नाल्यांमध्ये मुलांना खेळण्यासाठी जाऊ देऊ नये.
- आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.
- स्थलांतरित नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.
नागरिकांना सावधगिरीचा इशारा
मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी पूरस्थिती गंभीर रूप धारण करू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही कळविण्यात आले आहे.



