विधानसभेच्या येथील उमेदवाराला मतदारांनी दिली लाखभर रु.आर्थिक मदत

वेगवान नाशिक/Wegwan Nashik,
विशेष प्रतिनिधी, ३० ऑक्टोबर.
राज्यभरात एकीकडे दिवाळीची धामधूम तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचाराचा झंझावात सुरु झालेला असताना अचानकपणे एका गावात प्रचारासाठी गेलेल्या महिला उमेदवाराला ग्रामस्थांनी थोडीथिडकी नव्हे तर चक्क लाखभर रुपयांची देणगी देऊ केल्याने सादर उमेदवाराला आपला अश्रू आवरेना अशी स्थिती निर्माण झाली होती.
आपला निवडणुकीचे नामनिर्देशन पात्र भरून आल्यानंतर एक दिवस विश्रांती घेऊन आज सकाळी प्रचारासाठी निघालेल्या देवळाली विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मोहिनी गोकुळ जाधव यांना बेलतगव्हाण येथील ग्रामस्थ रवींद्र दोंदे,भाऊसाहेब महानुभाव यांनी ५० हजार तर उत्तमराव पागेरे,जयप्रकाश धुर्जड, शंकर पाळदे, आकाश पागेरे, अनिल उकार्डे यांनी ५० हजार रु. चा धनादेश देत आपल्या लाडक्या लेकीप्रमाणे असलेल्या या मोहिनी जाधव यांना एकूण १ लाखाची देणगी दिली आहे. या देणगीने त्या भारावून गेल्या. येथील हि देणगी त्यांनी आपले पती गोकुळ जाधव यांच्यासह ग्रामस्थांच्या हस्ते काल बुधवार दि. ३० रोजी सकाळच्या सुमारास स्वीकारली. यावेळी ग्रामस्थांनी यापूर्वीच्या आमदार सरोज आहिरे यांना देखील गावोगावी देणगी देऊन निवडून आणल्याचे सांगितले. या घटनेने मनसेच्या उमेदवार मोहिनी यांच्या नाव यानिमित्ताने देवळाली मतदार संघात चांगलेच चर्चिले जात आहे.