आई-वडिलांचे छत्र हरवले, मामांच्या कष्टाच पोरींन चीज केल…
शरद शेळके ,सिन्नर
बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या देवकौठे येथील निकिता सुरेश मुंगसे हिची पहिल्याच प्रयत्नात कारागृह पोलिस दलात निवड झाली आहे. संघर्षावर मात करत जिद्दीच्या बळावर निकिता हिने मिळवलेल्या यशामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणीच आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर निकिताचा सांभाळ तिचे मानोरी येथील मामा कृष्णा दत्तु म्हस्के व संतोष दत्तु म्हस्के यांनी केला. मामांच्या पाठिंब्यामुळे निकिताने दोडी व सिन्नर येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.सैन्य दलात असणारे मामा संतोष म्हस्के यांचे मिळालेले मार्गदर्शन वेळोवेळी प्रोत्साहित करत राहिले.
पोलिस भरतीसाठी आवश्यक तयारीसाठी निकिताने नांदूर-शिंगोटे येथे अकॅडमी मध्ये काही दिवस प्रशिक्षण घेतले. त्या शिस्तबद्ध मार्गदर्शनासोबत स्वतःची मेहनत व जिद्द यांच्या जोरावर तिने यश मिळवले. पोलीस दलात निवड झाल्यानंतर अनेक ठिकाणी तिचा सत्कार करण्यात आला. परंतु आई-वडिलांविना वाढलेल्या पोरीचा होणारा सन्मान, व कष्टमय प्रवास बघून आपोआप नातेवाईक व निकिताच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या.



