तृतीयपंथीयांच्या वेशात गुन्हेगार टोळी; हॉटेल मालकाच्या मुलांवर जीवघेणा हल्ला
संतप्त जमावाने झोडपून दिले पोलिसांच्या ताब्यात

मनोज वैद्य/
देवळा प्रतिनिधी

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे, सांगवी, चिंचवे परिसरातील हॉटेल तसेच हायवे वरील परिसरात रविवार १० ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ९.३० वाजे दरम्यान ४ ते ५ जण तृतीयपंथीयांच्या वेशात रिक्षातून सांगवी फाटा परिसरात दाखल झाले.

चेहऱ्यावर मेकअप, वेगळी वेशभूषा पण हेतू मात्र गुन्हेगारिचा मनात ठेवत या टोळीने आधी उमराणे परीसरातील छोट्या-मोठ्या दुकानदार, हॉटेल चालकांकडे जाऊन उघडपणे धमक्या दिल्या. “पैसे काढ नाहीतर चांगलं होणार नाही” अशा शब्दांत त्यांनी दबाव आणला. तसेच अनेक व्यावसायिकांना शिविगाळ केली. यानंतर टोळीने सांगवी फाटा येथील बजरंग ढाब्यात घुसून मालक अभिमन शेवाळे यांच्या मुलांकडे पैशांची मागणी केली. नकार मिळताच आरोपींनी चाॅपर व फायटरने सदर तरुणाच्या डोक्यावर वार करत त्याला गंभीर जखमी केले. या घटनेने हॉटेल परिसरात भीती व गोंधळ पसरला.

या हल्ल्याची बातमी स्थानिक नागरिकांना समजताच ते मदतीसाठी घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर आरोपी मक्याच्या शेताला लपण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडून संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला, आणि नंतर देवळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनातुन पोलीस उप निरीक्षक कैलास गुज्जर व त्याचे सहाकारी घटनास्थळी पोहचले असता त्यांच्या ताब्यात दिले.



