अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा मंजूर होऊ दिला जाणार नाही : आ. डॉ. राहुल आहेर यांची ग्वाही

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : देवळा शहरवासीयांवर अन्यायकारक असलेला प्रारूप विकास आराखडा कुठल्याही परिस्थितीत मंजूर होऊ दिला जाणार नाही. तसेच नवीन प्रारूप आराखडा तयार करताना सर्वांना विश्वासात घेतले जाईल अशी ग्वाही आ. डॉ राहुल आहेर यांनी दिली. यावेळी नगररचना विभागाचे सह संचालक रितेश चव्हाण, मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, अपूर्वा डोळे, नगराध्यक्ष भाग्यश्री पवार, उपनगराध्यक्ष संजय आहेर उपस्थित होते.
सहसंचालक, नगररचना विभाग, नाशिक यांनी तयार केलेला देवळा नगरपंचायत हद्दीतील विद्यमान जमीन वापर नकाशा. देवळा वासियांवर अन्याय करणारा असून हा प्रारूप विकास आराखडा त्वरित रद्द करावा. यासाठी शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेकडो शेतकऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते यावेळी आ. आहेर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
देवळा नगरपंचायत हद्दीतील प्रारूप विकास योजनेंतर्गत सह संचालक नगररचना विभाग नाशिक यांचे मार्फत विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यात आला असून, तो नगरपंचायतीत दि. २७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला. व त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना संदर्भात तीस दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानुसार नगरपंचायतीकडे शेकडो बाधित नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. यानुसार नगररचना विभागाने देवळा नगरपंचायत हद्दीतून अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण टाकून अन्याय झाल्याचे नागरिकांच्या सूचनेनुसार दिसून आले, यात अनेक शेतामधून १२ ते ३० मीटर पर्यंत चे रिंग रोड दाखविण्यात आले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या जागेवर शैक्षणिक आरक्षण, वाणिज्य आरक्षण, मोकळे भूखंड अशा प्रकारचे आरक्षण लादण्यात आले. सदरचा आराखडा मंजूर करत असताना शासनाकडून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदरचा आराखडा तयार करण्यात आल्याने प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद हरकतीद्वारे मांडण्यात आले.



